Breaking News

 

 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर बसण्याची दुर्दैवी वेळ : शरद पवार

मुंबई (प्रतिनिधी) : मंगळवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होईल. यावेळी राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल. हे भाषण ऐकायला अनेक संसद सदस्य येतील, तिथे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी महिलेसोबत बसावे लागण्याची दुर्दैवी वेळ येणार आहे. ही लोकशाही आणि राजकीय पक्षांना न शोभणारी ही गोष्ट आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साध्वी प्रज्ञा आणि भाजपवर टीका केली. तसेच राष्ट्रवादीची पाळेमुळे ग्रामीण भागात रूजली आहेत, पण छोट्या शहरांसह महानगरांमध्ये अधिक जोमाने पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असा संदेशही दिला. ते आज (सोमवार) मुंबईत राष्ट्रवादीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

आगामी काळात निवडणुकीत यशस्वी व्हायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसची ग्रामीण भागातील पक्ष, ही ओळख बदलण्याची गरज आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार वाढवायला पाहिजे. राष्ट्रवादीचा चेहरा ग्रामीण झाला आहे, ही बाब खरी आहे. त्यामध्ये काही चूक नाही. मात्र, ५० टक्के लोक शहरात राहतात. प्रत्येक तालुक्याचेही नागरीकरण झाले आहे. याकडे दुर्लक्ष करून आपल्याला संपूर्ण राज्यात यशस्वी होता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. 

त्यामुळे नागरीकरण झालेल्या भागांमध्ये राष्ट्रवादीचा विस्तार करण्याचा निर्धार आपण करुयात. त्यासाठी नागरी समस्या सोडवण्यासाठी आपण लोकांसोबत उभे राहिले पाहिजे. मुंबईत आपण जागा थोड्या लढवतो. मात्र, यावेळी किंवा विशेषतः महानगरपालिकेच्या वेळी जास्तीत जास्त कार्यकर्ते यांना संधी दिली पाहिजे तर पक्ष वाढेल. अनेकांना संधी मिळाली पाहिजे, असे मत यावेळी पवारांनी मांडले. 

जेव्हा आपण २० वर्षांपूर्वी पक्ष स्थापनेनंतर सत्तेत आलो तेव्हा अनेक तरुणांना संधी दिली, ते पहिल्यांदा मंत्री झाले. सर्व फळी तरुणांची होती. यामुळे पक्षाचा विस्तार होण्यास मदत झाली. आताही विचार करायला पाहिजे की, आता संघटनेच्या ठिकाणी किती नवीन फळी आहे? मला या गोष्टीची काळजी वाटते. त्यामुळे संघटनेतील चेहरे बदलून जास्तीत जास्त तरुणांना संधी दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

909 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे