मुंबई (प्रतिनिधी) :  कर्नाटक सीमावादप्रकरणी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आक्रमक झाले. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत पेन ड्राईव्हच सादर करत सीमावादावरच्या प्रश्नासंदर्भातली चित्रफित असणारा हा पेन ड्राईव्ह आहे. या पेन ड्राईव्हमध्ये सर्व पुरावे आहेत. यातील फिल्म सर्व आमदारांना दाखवावी असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केले. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असेपर्यंत सीमाभाग केंद्रशासीत करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत केली. उद्धव ठाकरेंनी आज विधानपरिषदेत आक्रमकरित्या सीमाप्रश्न मांडला. 

गेली अनेक वर्ष महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावाद, हा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे, दोन्ही राज्य संयमाने वागले पाहिजे, पण कर्नाटक सरकार संयमाने वागत नाही तसेच मराठी भाषिकांवर अन्याय सुरु आहे. दिलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये ७० च्या दशकात शरद पवार यांच्या पुढाकाराने एक फिल्म बनवली गेली आहे ‘केस फॉर जस्टीस’. या फिल्ममध्ये साधारण १८ व्या शतकातीलही पुरावे आहेत, सीमाभागात मराठी भाषा वापरली जात आहे.  सर्व गोष्टी फिल्ममध्ये दाखवण्यात आल्या आहेत. एक पुस्तकही दिले आहे. जो पर्यंत हा विषय सुप्रीम कोर्टात आहे, तोपर्यंत हा सीमाभाग केंद्रशासीत झाला पाहिजे अशी मागणी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.