Breaking News

 

 

ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन…

बंगळुरु (वृत्तसंस्था) :  ज्येष्ठ अभिनेते, नाटककार गिरीश कर्नाड यांचे आज (सोमवारी) सकाळी बंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. कर्नाड यांच्या निधनामुळे कलाविश्वाचा आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

गिरीश कर्नाड यांचा जन्म १९ मे १९३८ रोजी माथेरान येथे झाला होता. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ‘कार्नाड’ हे त्यांचं मूळ गाव आहे. पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण पार पडलं. तर, महाविद्यालयीन शिक्षण धारवाडच्या कर्नाटक कॉलेजात झालं. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी विद्यापीठात अव्वल क्रमांक पटकवला होता. 

भारतीय कलाविश्वात नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक अशा प्रत्येक भूमिकेला त्यांनी कायम समर्पितपणे न्याय दिला. साहित्य आणि कला क्षेत्रातील गाढे अभ्यासक म्हणून ते नेहमीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. या अद्वितीय कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं होतं. ज्यामध्ये पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांसह मानाच्या अशा ज्ञानपीठ पुरस्काराचाही समावेश आहे. भारतीय साहित्यातील योगदानासाठी १९९८ या वर्षी पहिल्यांदाच एखाद्या नाटककाराला या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

कर्नाड यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (१९९९) या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. तर ‘इक्बाल’ (२००५) आणि ‘लाइफ गोज ऑन’ (२००९) यासोबतच ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांतून ते झळकले होते. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं होतं. ज्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट ‘वंश वृक्ष’ (१९७२), ‘काडू’ (१९७४), ‘ओन्दानुंडू कालाडल्ली’ (१९७८) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (१९८०) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला होता. 

468 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग