Breaking News

 

 

उद्धव ठाकरे अयोध्येला जाण्याने काही होणार नाही : आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच राम मंदिराची निर्मिती होईल, उद्धव ठाकरेंच्या जाण्याने काही होणार नाही’ असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा १६ जून रोजी प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावरुन आठवले यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्याचा अधिकार आहे, त्यांना राम मंदिराची मागणी करण्याचा अधिकार आहे. मात्र, कायदा हातात न घेता, राम मंदिर बांधणे ही सरकारची भूमिका आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे, सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असून उद्धव ठाकरे दहावेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही, असे आठवलेंनी म्हटले आहे.

लोकांच्या भावनांचा विचार केला तर राम मंदिर व्हायला पाहिजे, या मताचा मी आहे. पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत आपल्याला थांबावे लागेल. हिंदू समाजाला जी जागा मिळेल, त्यात राम मंदिर बांधायला हवे. मात्र उद्धव ठाकरे त्याठिकाणी एकदा गेले काय आणि दहा वेळा जरी गेले, तरी त्यांच्या जाण्याने काही होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच तिथे राम मंदिर बनू शकते, असे आठवले म्हणाले.

519 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग