दिल्ली (वृतसंस्था) : जगभरातील काही देशांमध्ये कोव्हिड-१९ ची रुग्णसंख्या वाढत असल्याने भारतात चिंतेचे वातावरण आहे. चीनमध्ये कोव्हिड-१९ चा सबव्हेरियंट बीफ-७ च्या संसर्गात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भारतातही या व्हेरियंटचे ४ रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.

देशातील कोरोना स्थिती आणि त्यासंदर्भात यंत्रणेची तयारी यांचा आढावा घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचे बैठकांचे सत्र सुरू आहे. अनेक राज्यांनीही यासंदर्भात आणीबाणीच्या बैठका बोलावल्या कोरोना संदर्भात सगळेच जण सक्रिय झाले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, गेल्या २४ तासांत देशात कोरोना संसर्गाचे २०१ नवीन रुग्ण आढळले आहेत.

यामुळे भारतात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३३९७ वर पोहोचली आहे. देशात कोविडमधून बरे होण्याचे प्रमाण ९८.८ टक्के आहे. गेल्या २४ तासांत १८३ जण संसर्गानंतर बरे झाले आहेत. देशातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी ४१ लाख ४२ हजार ७९१ झाली आहे.