मुंबई (प्रतिनिधी) : ज्यांनी खोके घेतले ते तुरुंगात जाऊन आलेत. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नसतो ते ठोकशाहीची भाषा करतात, अशा शब्दात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. खोके घेणाऱ्यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती.

आमदार कधीही पैशासाठी फुटत नाहीत, पैशापेक्षा आमदारकी मोठी आहे. जे चार वेळा निवडून आले ते पैशासाठी फुटतील काय?, असा सवालच केसरकर यांनी राऊत यांना विचारला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूखंड घोटाळ्यावरही त्यांनी भाष्य केलं. हे प्रकरण क्लोज झाल्याचे नागपूर हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. भूखंड कुणालाही दिलेला नाही. संजय राऊत यांचे अज्ञान आहे. ज्या लोकांनी महापालिकेत काय काय केले हे बाहेर येईल म्हणून हा आरोप केला जात आहे. आम्ही टीका केली की काय होतंय हे आता समोर आले आहे.

संजय राऊत यांनी बोलत राहावे. टीका करत राहावे आम्ही काम करत राहतो, असे सांगतानाच त्यांनी एखादी सूचना मांडली असती तर आनंद झाला असता, असा चिमटा त्यांनी काढला.