कोल्हापूर (प्रतिनिधी) : वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी कठोर पावले शासनाने वनविभागाने उचलावीत अन्यथा महाराष्ट्रभर आक्रमक आंदोलन करावे लागेल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेने दिला आहे. या मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना देण्यात आले.

राज्यभर वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जंगलाशेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चंदगड, आजरा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी या तालुक्यांमधून वन्यजीव प्राणी शेतात व गावात घुसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वाघ, बिबट्या, हत्ती यासारख्या हिंस्र प्राण्यांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले, तर काहींना अपंगत्व आले आहे, असे किसान सभेने म्हटले आहे.

२१ डिसेंबर रोजी शाहूवाडी तालुक्यातील उदगीर जवळच्या वाड्यांमध्ये मनीषा रामू डोईफोडे या दहा वर्षाच्या निष्पाप मुलीचा बिबट्याने बळी घेतला. या अगोदरही अशाच पद्धतीने अनेकांना एकतर जीव गमावा लागला आहे किंवा अपंगत्व पत्करावे लागले आहे. याकडे महाराष्ट्र सरकार व वन विभाग यांचे दुर्लक्ष आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्या अथवा जखमी झालेल्या पीडित लोकांना त्वरित नुकसानभरपाई वाढवून मिळावी, वन्य प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यात बळी गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी, जिल्ह्यातील जंगलाच्या सीमेनजीकच्या गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची प्रभावी अंमलबजावणी शासनाने करावी, बिबट्यासारख्या प्राण्यांकडून जेव्हा हल्ले होतात त्याचे परिणाम काही वेळा तत्काळ न दिसता हे काही वर्षांनी ही गंभीर परिणाम दिसून येतात. असे पीडित मात्र नुकसान भरपाईला मुकतात. त्यांना दीर्घ कालानंतर देखील नुकसानभरपाई मिळावी. ज्या ठिकाणी जंगलाशेजारी वस्ती आहेत, त्या ठिकाणी वन विभागाचे पेट्रोलिंग वाढवावे, अशा मागण्या किसान सभेने केल्या आहेत.

यावेळी किसान सभेचे राज्य कौन्सिलचे सदस्य गिरीश फोंडे, रामचंद्र बुडकर, रघुनाथ जाधव, राम करे, प्रशांत आंबी, प्रवीण कोठावळे, सयाजी गुरव, श्रीकांत कोळी व कार्यकर्ते उपस्थित होते.