नागपूर : राज्य विधिमंडळ अधिवेशनाने राजकीय वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अचानक दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस पुणे येथे आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले होते; मात्र त्यांना अचानक दिल्लीहून निरोप आल्याचे समजते. त्यांनी मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच ते तातडीने पुण्याहूनच दिल्लीला रवाना झाले. फडणवीस यांना दिल्लीहून कशासाठी बोलावणे आले, याची चर्चा सुरू झाली आहे.

फडणवीसांवर हक्कभंग

दिशा सालियानप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. पटोले म्हणाले, फडणवीस यांनी दिशा सालियानप्रकरणी चुकीची माहिती दिली. त्यामुळे त्यांच्यावर सोमवारी हक्कभंग प्रस्ताव आणण्यात येणार आहे.

कोल्हे हत्याकांडाची चौकशी

उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आमदार रवी राणा यांनी याप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशीची मागणी केली. हे हत्याकांड झाले तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांना फोन केला, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी होईल, अशी घोषणा केली आहे.