मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी क्लीन चीटच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी क्लीन चीट देण्याचा कारखाना काढला आहे. उद्या ते कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मईंनाही क्लिन चीट देतील. उद्या दाऊदने भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यालाही क्लीन चीट मिळेल. अबू सालेम तुरुंगात आहे. त्याने पत्र लिहून भाजपबद्दल बरं बोलला तर त्यालाही क्लिन चीट देतील, असेही राऊत म्हणाले.

भाजपच्या राज्यात कुणालाही क्लीन चीट मिळू शकते. विरोधकांना गुन्हेगार ठरवले जाऊ शकते. मला क्लिन चीटचे फार आश्चर्य वाटत नाही. हा क्लीन चीटचा कारखाना आहे आणि दिलासा घोटाळा या सूत्रीवरच हे राज्य चालले आहे, असा हल्लाच संजय राऊत यांनी भाजपवर चढवला. शिंदे सरकारला अनेक शेपट्या फुटल्या आहेत. ते शेपट्या आत घालत आहेत. त्यांच्याकडे स्वाभिमान राहिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

याची एसआयटी लावताय, त्याला एसआयटी लावताय, याला क्लीन चीट देता, त्याला क्लिनचीट देता. उद्या तुम्ही बोम्मईंनाही क्लिनचीट द्याल. आणि २०लाख बांधावांना गुन्हेगार ठरवाल. बोम्मईंवर खटला दाखल करा ना. आमच्यावर खटला दाखल करता, बोम्मईवर करा, असे आव्हानच त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिले.

दरम्यान, रिया चक्रवर्तीला ४४ फोन आले होते. ‘एयू’ या नावाने हे फोन आले होते. हे ‘एयू’ कोण आहेत? याची चौकशी करा, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. तसेच या नावाचा आदित्य ठाकरे यांच्या नावाशीही संबंध जोडण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले होते.