नागपूर (वृत्तसंस्था) : राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा गटनेते जयंत पाटील यांचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला. जयंत पाटील यांनी वापरलेल्या शब्दांमधून सभागृहाचा आणि अध्यक्षांचा अवमान झाला असल्याचे निरीक्षण अध्यक्ष नार्वेकर यांनी नोंदवले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याचा दावा करत सत्ताधारी पक्षांनी आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

हिवाळी अधिवेशनात विधानसभेतील वातावरण तापले आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजन दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाची सोखल चौकशी व्हावी अशी मागणी शिंदे गट आणि भाजपमधील आमदारांकडून सातत्याने केली जात होती. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे या प्रकरणात नाव घेण्यात आल्याने त्यांना हा मोठा झटका मानला जात आहे.

याच मुद्द्यावर विधानसभेत चर्चा सुरु असताना शिवसेना (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांना बोलू द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. या मुद्द्यावर सर्व विरोधक आक्रमक झालेले असताना अध्यक्ष नार्वेकरांनी मात्र त्यास नकार दिला. या सगळ्या गोंधळात जयंत पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून “तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका,’ असा शब्दप्रयोग केला. सत्ताधाऱ्यांकडून याच निर्लज्ज शब्दावर आक्षेप घेण्यात आला.

जयंत पाटील यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य केले. नागपूर अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. तसेच त्यांच्या वक्तव्यावर चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असा ठराव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहाचा त्याग केला.