कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय विमान प्राधिकरण व एअर इंडिया कंपनीकडून प्रवाशांची लुबाडणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवस आधी तिकीट काढूनसुध्दा प्रवाशांना सीट उपलब्ध करून न देता ऐनवेळेस येणाऱ्या प्रवाशांना जादा दराने तिकीट विक्री करून प्रवाशांची आर्थिक फसवणूक करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, हा प्रकार राजरोसपणे घडत असल्याची तक्रार माजी खा. राजू शेट्टी यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे.

माजी खा. राजू शेट्टी यांच्या बाबतीत विमान प्रवासादरम्यान या गोष्टी घडल्यानंतर त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. एअर इंडिया कंपनीकडून याबाबत गेल्या दोन महिन्यांत मुंबई ते भोपाळ व आज दिल्ली ते पुणे या प्रवासादरम्यान असा प्रकार घडून आला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी १८ ऑक्टोबर रोजी राजू शेट्टी यांनी मुंबई ते भोपाळ तिकीट चार दिवस आधीच काढले होते. सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी विमान उड्डाण घेणार असल्याने ते पहाटे ४ वाजताच विमानतळावर राजू शेट्टी पोहोचले होते.

दरम्यान, बोर्डिंग पास काढण्यासाठी गेले असता एअर इंडियाच्या प्रशासनाकडून सीट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. दिल्लीहून पुण्याला येत असताना बोर्डिंग बंद होण्याच्या ४५ मिनिटे आधी पोहचूनही व दोन दिवस आधी तिकीट काढूनही सीट उपलब्ध नसल्याचे एअर इंडियाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. १५ मिनिटांनी त्याच विमानात त्यांना दोन सीट उपलब्ध करून देण्यात आले. मग ह्या जागा कोठून आल्या? यामुळे राजू शेट्टी यांनी भारतीय विमान प्राधिकरण व एअर इंडियाच्या या कारभाराबाबत केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचेकडे तक्रार केली आहे.