कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत. पाणी पुरवठ्याचे नियोजन बिघडल्याने अनेक ठिकाणी अवेळी व गढूळ पाणी येत आहे. गांधी मैदानाच्या सपाटीकरणाचे काम प्रलंबित आहे. रस्त्यावरील धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

शहरातील रस्ते दर्जेदार करावेत, या मागणीसाठी आम आदमी पार्टीने जागर आंदोलन केले होते. त्याची दखल घेत महापालिकेने अभियंताना सूचना केल्या होत्या. वर्कऑर्डर काढून सहा महिने उलटूनही काम सुरू न केलेल्या ठेकेदारांना महापालिकेने नोटीस बजावून एका ठेकेदाराला दंड देखील केला; परंतु अद्याप रस्त्यांचे काम संथगतीने सुरू असल्याने कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करा, अशी मागणी संदीप देसाई यांनी केली.

यावर अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी शासनाच्या नियमावलीनुसार कारवाई करत असल्याचे सांगितले. यावेळी नवीन रस्त्यांचा आणि पॅचवर्कचा दर्जा सुधारण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून रस्ते दक्षता समिती नेमण्याची मागणी देसाई यांनी केली, यावर आठ दहा दिवसात कायदेशीर बाबी लक्षात घेवून त्यांची पूर्तता करण्याबाबतचा प्रस्ताव करू असे आश्वासन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिले.

माती व व्हायब्रेटर वापरून गांधी मैदानाचे सपाटीकरण करावे, आयटीआय हॉस्टेलमधील पाणी गळती रोखावी, पाणीपुरवठा विभागातील सरळसेवा नियुक्त्या, आरोग्य उपकेंद्रांमधील नियुक्त्यांसाठी पाठवपुरावा सुरू ठेवावा, घरफाळा स्पेशल ऑडिटसाठी पत्रव्यवहार करावा, टिपरचालकांच्या समस्या सोडवाव्यात, सम्राटनगर ओढ्यातील बीएसएनएलची अनधिकृत बांधकाम हटवावे, अपंग सोसायटीतील रस्ता करावा, शालेय पोषणचे टेंडर त्वरित काढावे, कळंबा येथील डीपी रस्ता व हॉकी स्टेडियमला येणाऱ्या रस्त्याच्या अडचणी सोडवाव्यात आदी मागण्या करण्यात आल्या.

जलअभियंता हर्षजित घाटगे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता महादेव फुलारी आणि अधिकारी तसेच ‘आप’चे जिल्हाध्यक्ष नीलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, संजय साळोखे अमरजा पाटील, मोईन मोकाशी, डॉ. उषा पाटील, दुष्यंत माने, समीर लतीफ, मयूर भोसले, शशांक लोखंडे, सचिन वणीरे, प्रथमेश सूर्यवंशी, उमेश वडर, टिपरचालक आदी उपस्थित होते.