धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यात गेली ७१ वर्षे एकाच नेतृत्वाखाली लाडवाडी, नऊ नंबर, कुरणेवाडी, जाधववाडी, तुळशी धरण वसाहत आणि धामोड अशा या धामोड ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी रेश्मा सदाशिव नवणे या निवडून आल्या असून, त्यांच्या गटाचे नऊ आणि विरोधी गटाचे चार सदस्य निवडून आले आहेत.

सत्तेचा सारीपाट पाहता आजच्या काळात एक हाती सत्ता ठेवणे एवढे सहजासहजी शक्य नाही. या अगोदर आजी-माजी खासदार, आमदार, मंत्र्यांच्या राजकारणाचा इतिहास पाहता इतकी वर्षे ग्रामपंचायतीची  सत्ता एका घराण्याकडे ठेवणे सहजासहजी शक्य झालेले नाही; परंतु ही किमया केली आहे धामोडचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कै. अण्णासाहेब नवणे यांनी आणि त्यांच्या विचारावर चालणारे त्यांचे चिरंजीव सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब नवणे यांनी.

१९५२ साली स्थापन झालेल्या धामोड ग्रामपंचायतीमध्ये आजपर्यंत नवणे अण्णांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये या ग्रामपंचायतीची किल्ली आलेली आहे. त्यामुळे उगीचच कोणी कोणाकडे सत्ता देत नसते, हेही या ठिकाणी दिसून येते.

या यशाबद्दल नूतन सरपंच रेश्मा नवणे यांच्याशी ‘लाईव्ह मराठी’ने संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, यामागे अण्णांचे कार्य, माणसाबद्दल त्यांची असणारी आपुलकी, नेतृत्वाची कसोटी आणि सहनशीलता यात लपले आहे. त्यामुळे उगीचच कोणी कोणाकडे सत्ता देत नसते. त्यामागे एक वास्तववादी सत्य लपलेले असते आणि हेही तितकेच खरे आहे.