नागपूर (वृत्तसंस्था) : राज्यात लवकरच डॉक्टर्स, तंत्रज्ञांच्या साडेचार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गिरीश महाजन यांनी केली. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली.

अधिवेशनात गिरीश महाजन म्हणाले, आम्ही एमपीएसच्या माध्यमातून ३०० डॉक्टर्स  भरले आहेत. सध्या २८ टक्के पदे रिक्त आहेत यासंदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एमपीएससीमार्फत जागा भरण्यास वेळ लागतो. महाजन पुढे म्हणाले, आतापर्यंत १० टक्के हॉस्पिटल आणि ९० टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होती, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलत आहोत. आता ३० टक्के हॉस्पिटल आणि ७० टक्के हाफकिन अशी औषध खरेदी केली जाईल.

नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे रुग्णांची संख्या मोठी असते. व्हेंटिलेटर तत्काळ उपलब्ध करायचे म्हटले तरी ते शक्य होत नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. म्हणून जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात येतील, असे महाजन म्हणाले. २०२४ पर्यंत जे. जे. सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल करत आहोत. रिचर्ड अॅंड क्रुडास येथील जागा जी ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आली होती. त्यांची मुदत २० वर्षांपूर्वी संपली आहे. ती जागा ‘जे.जे.’ला मिळाली तर मोठा फायदा होणार आहे. हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात आहे. लवकरच निर्णय लागेल, असे महाजन म्हणाले.