पंढरपूर (प्रतिनिधी) : पी. एम. किसान सन्मान योजनेच्या लाभापासून त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून पी. एम. किसान सन्मान योजनेद्वारे वार्षिक ६  हजार रुपये प्रमाणित बँक खात्यावर मिळतात; परंतु मागील २ हप्त्यापासून जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी वंचित राहिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार तलाठी स्तरावरील पडताळणीमध्ये अनेक शेतकरी अपात्र ठरले आहेत. काही शेतकरी एका गावात राहत असून, जमीन दुसऱ्या गावात आहे. त्यांच्या योजनेचे रजिस्ट्रेशन जमीन असलेल्या गावात अद्ययावत करावे तसेच इतर काही त्रुटी असल्याने ते अपात्र ठरत आहेत.

अनेक शेतकरी तहसील आणि तलाठी कार्यालयात गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात विशेष शिबिरे आयोजित करावी व त्या सर्व शेतकऱ्यांची त्रुटी पूर्तता करावी व तसेच कायमस्वरुपी एक अधिकारी या प्रत्येक तहसील कार्यालयात उपलब्ध करून द्यावा. राहिलेल्या आणि त्रुटी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ देऊन न्याय द्यावा. या आशयाचे पत्र जिल्हा अधिकारी आणि प्रत्येक तहसील कार्यालयाला देण्यात आले. या प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, तालुका अध्यक्ष अमोल केसरे, उपाध्यक्ष भास्कर कदम, विद्यार्थी तालुका अध्यक्ष प्रवीण लोकरे, बाळासाहेब साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते.