कागल (प्रतिनिधी) : कागलच्या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या संमिश्र आघाड्यांना यश मिळाले आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदार हसन मुश्रीफ यांना दहा ठिकाणी, भाजपाचे समरजितसिंह घाटगे यांना सहा ठिकाणी, शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांना सहा ठिकाणी, तर ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे यांना चार ठिकाणी सरपंचपदे मिळवण्यात यश आले आहे.

कागल तालुक्यातील बामणीत पहिला निकाल लागला आहे. मुश्रीफ गटाला तीन ठिकाणी धक्का बसला आहे. सरपंचासह राजे गटाने बाजी मारली आहे. बामणी निढोरी आणि रणदिवेवाडी या कागल तालुक्यातील तीनही गावात भाजपचा झेंडा फडकला आहे. कसबा सांगाव येथे मुश्रीफ गटाला धक्का बसला असून, सरपंचपदी राजे-मंडलिक गटाने बाजी मारली आहे. व्हनाळीत माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे हे सरपंचपदी विजयी झाले आहेत.

आनूूर येथे संजय घाटगे गटाचे काकासाहेब मारुतीराव सावरकर हे सरपंचपदी विजयी झाले आहेत. बोरवडे, ता. कागल येथे धक्कादायक निकाल लागला असून, सरपंचपद मंडलिक गटाला मिळाले आहे.

माजी आमदार आणि बिद्री कारखाण्याचे चेअरमन के. पी. पाटील यांनी आपला गड कायम राखला आहे. मुदाळमध्ये राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व म्हणजे १२ सदस्य विजयी झाले आहेत. कागल तालुक्यातील सेनापती कापशीमध्ये मुश्रीफ गटाचा मोठा विजय संपादन करून सत्ता मिळवली आहे. हमीदवाडा येथे मंंडलिक गटाचे कृष्णात बाबूूराव बुरटे हे विजयी झाले आहेत. बोळावी येथे मुश्रीफ गटाचे सागर ज्ञानदेव माने, तर बाळेगाव येथे मुश्रीफ गटाचे शिरसाप्पा गुंडाप्पा खटकले हे सरपंचपदी विजयी झाले आहेत.