कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे परिसरातील १३ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज (रविवार) कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले. यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर कळे पोलिस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी कळे पोलीस ठाण्याचे सपोनि. प्रमोद सुर्वे, पन्हाळा गटविकास अधिकारी तथा झोनल अधिकारी सुभाष सावंत यांनी भेट देवून पाहणी करून सूचना दिल्या. तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी मरळी ९६ टक्के, घरपण ८५, परखंदळे ९०, गोठे ९०, तांदूळवाडी ९६, आकुर्डे ९०, पणुत्रे ८२, पणोरे ९४, वेतवडे ९७, वाघुर्डे ९६, मोरेवाडी ९५, मल्हारपेठ ८३, सावर्डे तर्फ असंडोली येथे ९० टक्के मतदान झाले. आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी प्रत्येक मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. मात्र, १० वाजल्यानंतर मतदान केद्रावर गर्दी झाली. दुपारी २ वाजेपर्यंत सरासरी ७० टक्के मतदान झाले. यावेळी काही अपंग आणि वयस्कर लोकांना गाडीच्या माध्यमातून सोय केली जात होती.