मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी आज सुमारे ७४  टक्के मतदान पूर्ण झाले आहे. सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले.

दुपारी ३.३० पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी ६७ टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्तभागात दुपारी ३.३० वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. आता २० डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या या मतदानात जनतेने नेमका कुणाला कौल दिला हे अवघ्या दोन दिवसांत कळणार आहे.

राज्यात अहमदगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड,भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका पार पडल्या आहेत.