सांगोला (प्रतिनिधी) : मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांच्या पथकाने अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणारा पिकअप पकडला. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन व ३ हजार रुपयांची अर्धा ब्रास वाळू असा १ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सांगोला तालुक्यात अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मिळालेल्या आदेशानुसार पोलीस नाईक सुनील मोरे, स.पो.फौ. तोंडले, पो. कॉ. सावंत असे खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना वाढेगाव ते लक्ष्मीदहीवडी जाणाऱ्या रोडने एक पिकअप अवैध वाळू भरुन येत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी सी.जे. ०३५२ एम. एच. १३ या पिकअपला इशारा करून थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाळूने भरलेला पिकअप न थांबवता भरधाव वेगात पळवू लागला. पोलिसांनी पिकअपचा पाठलाग केला असता, पिकअप बामणी बसस्टॅन्डजवळ थांबवून दोघेजण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन व ३ हजार रुपयांची अर्धा ब्रास वाळू असा १ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस नाईक सुनील मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा अज्ञात व्यक्तींविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.