नागपूर (वृत्तसंस्था) : मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे, असे विधान भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले आहे. बावनकुळेंच्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. पूर्व नागपुरात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. या कार्यक्रमाला फडणवीसही उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘जो-जो समाज त्यांच्याकडे गेला, ज्या-ज्या समाजावर अन्याय झाला. तो अन्यान देवेंद्र फडणवीसांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज आपली सर्वांची जबाबदारी आहे, किमान मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. महाराष्ट्राचे भविष्य केवळ देवेंद्र फडणवीस बदलू शकतात.”

फडणवीस हे जाती-पातीच्या पलीकडे गेलेले नेते आहेत. ते सर्व समाजासाठी काम करतात. म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे की, ‘२०१४ ते २०१९’ चा काळ पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे काय झाले पाहिजेत? असा प्रश्न विचारत बावनकुळेंनी लोकांकडूनच प्रतिसाद घेतला. लोकांनी ‘मुख्यमंत्री’ असे उत्तर दिल्यानंतर बावनकुळेंनी संबंधित विधानाला सहमती देत पुढील भाषण केले.