सांगोला (प्रतिनिधी) : ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या १०९ व्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाने रविवारी करण्यात आली.

सांगोला येथील नाम साधना मंडळाच्या वतीने श्रीराम मंदिर व ध्यान मंदिर सांगोला येथे पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नामजप, भजन, उपासना, कीर्तन, प्रवचन, भक्तीसंध्या आदी विविध कार्यक्रम दहा दिवस सुरु होते. दहा दिवस चाललेल्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता रविवारी सकाळी श्रीराम मंदिरात शुभांगी कवठेकर यांच्या गुलालाच्या कीर्तनाने झाली.

कवठेकर यांच्या कीर्तनानंतर ‘श्रीराम जय राम जय जय राम’ च्या जयघोषात महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. कीर्तनकार शुभांगी कवठेकर यांना तबल्याची साथ सुधाकर कुंभार यांनी, तर हार्मोनियमची साथ शशिकांत लाटणे यांनी केली. कीर्तनानंतर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रतिमेची पालखी प्रदक्षिणा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. या पालखी प्रदक्षिणामध्ये शहरातील स्त्री-पुरुष भाविक सहभागी झाले होते. दुपारी १२ वा. ध्यान मंदिरात महाराजांची आरती व उपासना झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.