कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होत आहे. ४५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता ४३० ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. गेल्या दहा दिवसांपासून जिल्हाभर प्रचाराचा धुरळा उडला होता. गाव कारभारी होण्यासाठी शेवटच्या टप्प्यात मनी आणि मसल पॉवरचाही वापर करण्यात आला.

सर्वच तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असल्याने प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतदान सुरळीत पार पडण्यासाठी जिल्ह्यात ९ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर ज्या ठिकाणी १३ पेक्षा जास्त उमेदवार आहेत, त्या त्या गावात मतदान केंद्रावर तीन तीन मतदान यंत्रे सुरु करावी लागणार आहेत. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्याना कसरत करावी लागणार आहे.

निवडणूक प्रक्रियेसाठी ३७४० बॅलेट युनिट आणि २७९९ कंट्रोल युनिट आज देण्यात येतील. जिल्ह्यातील एकूण १८२७ केंद्र म्हणून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून ९१३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली. सरपंचपदासाठी ११९३, तर सदस्यपदासाठी ८९१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रविवारी होणारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी केली आहे.

जिल्ह्यात रविवारी मतदान केंद्रांवर १४४ कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश जारी केला आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात  राजकीय पक्षांचे बूथ लावणे,  प्रचार साहित्य बाळगणे तसेच मोबाईलचा वापरास प्रतिबंध असणार आहे.

जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींसाठी सुरु असलेल्या प्रचाराचा तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. त्यामुळे पडद्यामागून हालचालींना वेग आला होता. जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये निवडणूक होत असल्याने अत्यंत इर्ष्येने प्रचार झाला. थेट सरपंचपदाची निवडणूक असल्याने या पदासाठी राजकीय नेत्यांनी सुद्धा प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आगामी विधानसभेसाठी गणित गृहित धरून आजी-माजी आमदारांनी या निवडणुकीसाठी मोठी रसद पुरवली आहे.

ज्या गावांमध्ये निवडणूक नाही, त्या गावातील कार्यकर्तेही संवेदनशील गावांच्या प्रचारासाठी अखेरच्या दिवशी उतवरण्यात आले होते. अखेरच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी मतदारापर्यंत पोहोचण्यसाठी शक्य त्या सर्व मार्गाने प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यामुळे गलोगल्ली रिक्षा, कार्यकर्ते प्रचाराच्या शेवटच्या मिनिटांपर्यंत पायाला भिंगरी लावून फिरत होते.