मुंबई (प्रतिनिधी) : ज्यांच्या हातात सत्तेची चावी आहे, ते महाराष्ट्राचा महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. मोर्चाच्या रुपाने ही जनशक्ती महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकवटली आहे. सध्या महाराष्ट्राच्या सन्मानावर हल्ले होत आहेत. या सरकामध्ये सध्या महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू आहे, असा आरोप करून महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज शनिवारी महामोर्चा काढला होता. मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यावर शरद पवार यांच्यासह अनेकांची भाषणे झाली.

सामान्य माणसाच्या अंत:करणात कायम ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे नाव असते. आज ३५० वर्षे झाली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवरायांचे नाव घेतले जाते; पण राज्याच्या सरकारमधील मंत्री हे शिवरायांबद्दल वाटेल ते विधान करतात. अन्य कुणी काही तरी बोलतो. हे महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा पवारांनी दिला.

महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात महामोर्चा : उद्धव ठाकरे

महाराष्ट्र द्रोह्यांचा शेवट करणारा हा मोर्चा आहे. महाराष्ट्र द्रोह्यांना गाडण्यासाठी आम्ही एकत्र जमलो आहोत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. छत्रपतींचे नाव घेण्याचा लफंग्यांना अधिकार नाही, कोश्यारींना राज्यपाल मानत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ज्यांनी-ज्यांनी डिवचले त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जगाने हे दृश्य पहिल्यांदाच पाहिले. बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. सर्व पक्ष एकटवलेत आहेत. फक्त महाराष्ट्र द्रोही आणि बाळासाहेबांचे विचार सोबत घेऊन जाणारे तोतये या महामोर्चा नाहीत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

संकट काळात महाराष्ट्र पेटून उठतो : अजित पवार

महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी, महाराष्ट्र द्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी, त्यांच्या मनात धडकी भरवण्यासाठी हा हल्लाबोल मोर्चा आयोजित केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून हे सरकार आले. संकट जेव्हा महाराष्ट्रावर असते, तेव्हा महाराष्ट्र एकजूट होऊन पेटून उठतो. तो ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

भाजपचा खरा चेहरा समोर आला : नाना पटोले

महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात महाराष्ट्र एकत्रित झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान केला आहे. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी तर अपमानाचा कळस गाठला. त्यामुळे भाजपचा खरा चेहरा समोर आला, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

महामोर्चा हे पहिले पाऊल : संजय राऊत

महाविकास आघाडीचा मोर्चा सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकेलेले पहिले पाऊल आहे. यापुढे गावा-गावात केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.