कळे (प्रतिनिधी) : संथगतीने सुरु असलेल्या धामणी धरणाचे काम आम्ही कधीच बंद पाडलेले नाही. प्रशासन आम्हालाही सहकार्य करत नाही. प्रशासन जनतेची दिशाभूल करून निधी शिल्लक असताना काम सुरु करण्यासाठी चालढकल करत आहे, असा आरोप कुंभी धामणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजित पाटील यांनी केला आहे.

पाटबंधारे विभाग कंत्राटदाराला पाठीशी घालत बघ्याची भूमिका घेऊन धामणी खोऱ्यातील जनतेची चेष्टा करत आहे. प्रकल्पासाठी तरुणांनी उपोषणाचा इशारा दिल्यावर त्याच दिवशी कंत्राटदाराने अनामत रक्कम भरली व  वर्कऑर्डर काढून आठ दिवसांत काम चालू केले. त्यावेळी प्रशासनाने किरकोळ स्वरूपात काम सुरु केले. नंतर नोव्हेंबरपासून पूर्णगतीने काम सुरु करण्याचे, घळभरणीचे ५० टक्केपर्यंतचे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आणि मे २०२४ अखेर डॅम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.

आता डिसेंबर महिना निम्मा संपला तरी काम पूर्णगतीने चालू झालेले नाही. म्हणून १२ डिसेंबर रोजी या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी धरणग्रस्त धरणाच्या कामामध्ये अडथळा आणत असल्यामुळे काम पूर्णगतीने चालू करता येत नसल्याचे सांगितले.

धरणग्रस्त समितीने ‘आम्ही धरणग्रस्तांची भेट घेतो व त्यांना विनंती करून कामात अडचण आणू नका. ते तयार झाले तर तुम्ही कधी काम पूर्णगतीने चालू कराल का?’ असे अभियंता पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर्षी काम पूर्णगतीने चालू करण्याचे नियोजन नसल्याचे सांगून पुढच्या वर्षीच पूर्णगतीने काम केले जाईल. मे २०२४ अखेर ५० टक्केपर्यंत व मे २०२५ अखेर पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले.

शिष्टमडळाने धरणग्रस्त समितीच्या अध्यक्षांची भेट घेतली असता ते म्हणाले, येत्या १५ दिवसांत काम पूर्ण क्षमतेने चालू झाले नाही, तर धामणी खोऱ्यातील जनतेचा उद्रेक होईल, असे डॉ. अजित पाटील यांनी म्हटले आहे.

धरणाच्या कामात व्यत्यय नाही

धरणाचे काम संथगतीने काम सुरु ठेवल्यास धरण पूर्णत्वास येण्यास बरीच वर्षे लागतील. आम्ही धरणग्रस्त न्याय मिळवण्यासाठी धडपडत आहोत; पण प्रशासनाचे सहकार्य म्हणावे तसे मिळत नाही. आम्ही कधीही धरणाच्या कामात व्यत्यय आणलेला नाही, असे धरणग्रस्त कृती समितीचे कृष्णात आरबुने यांनी सांगितले.