कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील माले गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनशक्ती पॅनेलच्या लोकनियुक्त सरपंच व सर्व सदस्यांना विजयी करून मालेतील विकासकामांचा ठसा जागतिक पटलावर उमटवण्यासाठी संधी द्यावी, असे आवाहन माजी उपसरपंच व सध्याचे सरपंचपदाचे दावेदार उत्तम गोविंद पाटील यांनी केले आहे.

उत्तम पाटील म्हणाले, घराघरात मुबलक स्वच्छ पाणी देण्यासाठी प्रस्तावित वारणा नदीवरील जॅकवेलचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिक्षण ही प्राधान्याची गरज ओळखून प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी त्या आयएसओ नामांकनापर्यंत नेण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावामध्ये यूपीएससी, एमपीएससीच्या अभ्यासक्रमासाठी ग्रंथालयाची निर्मिती अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडवला जाईल. त्याचबरोबर शिवाजी महाराज क्रीडांगणावर मैदानी खेळांना प्राधान्य देऊन राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी लक्ष केंद्रित करणार आहे.

गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांचा विचार करून जनता आपल्याला लोकनियुक्त सरपंचपदासाठी पात्र ठरवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अपुऱ्या कामांची पूर्तता येणाऱ्या दिवसात करण्याचा मानस असून, यामध्ये पाणंद रस्ते, माले गाव पर्यावरणपूरक स्वच्छ व सुंदर करण्याबरोबर समाजातील सर्वच घटकांना बरोबर घेऊन समानतेने सर्वांना लाभ मिळवून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. विकासकामात गट-तटाचे राजकारण न करता समाजकारणावर लक्ष केंद्रित करुन जनतेसाठी २४ तास आणि ३६५ दिवस अहोरात्र उपलब्ध असणार असल्याची ग्वाही उत्तम पाटील यांनी दिली.

पाणीपुरवठा, वीज बचतीसाठी सौर प्रकल्पाची आखणी केली असल्याने भविष्यात माले गाव हे जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि राहणार आहे. यासाठी जनशक्ती ग्रामविकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन उत्तम पाटील यांनी केले आहे.