पेठवडगाव (प्रतिनिधी) : चतुर्थ वार्षिक कर आकारणी या नावाखाली वडगाव नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सरसकट २० टक्के वाढीव दराने घरफाळा भरण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

शासनातर्फे दर चार वर्षांनी नगरपालिकांना नव्याने घरफाळा आकारणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार २०२२ ते २०२६ या चार वर्षांच्या काळासाठी पुनर्मूल्यांकनाबाबतची मालमत्तेची नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये सरसकट २० टक्के घरफाळा वाढवण्यात आला आहे. या कर आकारणीबाबत तक्रार असल्यास ३० दिवसांच्या आत नगरपालिकेकडे लेखी अर्ज करण्यात नमूद केले आहे; परंतु सध्या नगरपालिकेची मुदत संपल्यामुळे प्रशासकांकडे कारभार आहे.

नगरपालिकेने जुन्या दराने घरफाळा भरल्यानंतरच या नव्या नोटीसबाबत हरकती घेण्यास नागरिकांना कळवले आहे. नगरपालिकेची निवडणूक न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी सत्तेवर नसताना अशी घरफाळा वाढ कशी करण्यात आली, याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. ही सरसकटची घरफाळा वाढ रद्द करण्याची मागणी यादव आघाडीच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढून करण्यात आली होती. निवडणुका झाल्यानंतरच याबाबत लोकप्रतिनिधी योग्य तो निर्णय घ्यावा व घरफाळा भरण्याची सक्ती नगरपालिकेने करू नये व हरकतींचे अर्ज भरून घेण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.