मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगीची अडचण नाही, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मुंबईत शनिवारी (दि. १७ डिसेंबर) होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चा अद्यापही पोलिसांनी परवागनी दिलेली नाही, असे मविआ नेत्यांनी म्हटले होते. त्याबाबत विचारले असता मोर्चाला परवानगीची अडचण नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपचे नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान त्याचप्रमाणे कर्नाटक सीमावादाचा सुरु असलेला प्रश्न या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी मुंबईत १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढणार आहे. लाखोंच्या संख्येने गर्दी जमवण्याचे लक्ष्य महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांसमोर आहे; परंतु मुंबई पोलिसांकडून मोर्चाला परवानगी मिळाली नसल्याचे मविआच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.

फडणवीस म्हणाले की, मोर्चा शांततेत व्हावा, त्याला परवानगी दिलेली आहे. लोकशाही पद्धतीने कोणाला विरोध करायचा असेल तर ते करतील. कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, एवढ्यापुरता सरकारचा त्यात हस्तक्षेप असेल. मोर्चाच्या मार्गांसंदर्भात त्यांच्याशी बोलणे झालेले आहे. त्यांनी सांगितलेला मार्ग मान्य केलेला आहे. मला वाटत नाही की परवानगीची अडचण आहे. भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने येणार आहे.