सांगोला (प्रतिनिधी) : वीज बिल थकबाकी वसुलीसाठी व वीज चोरीला आळा घालण्यासाठी कार्यालयीन टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. घरगुती, औद्योगिक व शेतीपंप वीज ग्राहकांकडे थकबाकी आहे, अशा ग्राहकांनी थकबाकी न भरल्यास त्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे. असा इशारा सांगोला महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी दिला आहे.

सांगोला तालुक्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक असे एकूण ४५ हजार आणि शेतीपंपाचे एकूण ३५ हजार वीज ग्राहक आहेत. घरगुती व्यवसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांकडे थकबाकीपोटी २ कोटी ६२ लाख रूपये थकबाकी आहे. शेतीपंपाचे एकूण ४५० कोटी रुपये थकबाकी आहे. ही बाकी वसूल करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यालयाकडून प्रयत्न केले जात आहे. थकबाकी मोहिमेतंर्गत ९ शाखा कार्यालय अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून ही वसुली केली जाणार आहे. थकबाकी न भरल्यास त्या ग्राहकांचा जागेवरच वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे.

वरिष्ठांच्या आदेशानुसार सांगोला शहर आणि तालुक्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी वसुली पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. थकबाकी वसुली मोहिमेतंर्गत सांगोला महावितरण कार्यालयाकडून वीज बिल वसुली मोहिमेला व विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला धुमधडाक्यात सुरुवात केली आहे. विशेष टीमद्वारे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. वीज ग्राहकांनी आपला थकीत व चालू वीज बिल भरावे आणि कारवाई टाळावी, असे आवाहन कार्यकारी उपअभियंता आनंद पवार यांनी केले आहे.

निधीनुसार वीजपुरवठा सुरु करणार

डिसेंबरमध्ये सांगोला तालुक्यात एक हजार शेतीपंपांना वीज कनेक्शन जोडणी करण्याचे महावितरणचे उद्दिष्ट आहे. ज्या शेतकऱ्यांना शेतीपंपाला वीज कनेक्शन जोडणी करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज सादर करावेत. चार पोलच्या आतील वीज कनेक्शन देण्यासाठी निधी उपलब्ध झाल्यास तातडीने वीजपुरवठा सुरळीत सुरू केला जाणार आहे.

-आनंद पवार, उपकार्यकारी अभियंता, सांगोला