Breaking News

 

 

कोयनेतून वीजनिर्मिती बंद, मात्र भारनियमन नाही ! : महावितरणचा दिलासा

मुंबई (प्रतिनिधी) : अपुर्‍या पाणीसाठ्यामुळे कोयना विद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातील वीज निर्मिती आठवडाभरापासून बंद करण्यात आली असली, तरी अन्य मार्गाने पुरेशी वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे राज्यात कुठेही भारनियमन करावे लागणार नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

अपुर्‍या पावसामुळे राज्यातील इतर धरणांप्रमाणेच कोयना धरणातही सध्या अत्यल्प पाणीसाठा आहे. यंदा पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता असल्याने उपलब्ध पाणीसाठा २५ जुलैपर्यंत राखीव ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे कोयना जलविद्युत प्रकल्पामधून वीज निर्मिती बंद ठेवण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने दिल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीने (महानिर्मिती) २९ मेपासून कोयना जलविद्युत प्रकल्पातील टप्पा क्रमांक ४ मधील वीज निर्मिती बंद केली आहे. चिपळूण तालुक्याचा पाणी पुरवठा नियमित सुरू ठेवण्यासाठी टप्पा क्र. 1 व 2 मधून कमी दाबाने केवळ ४० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे.

त्यामुळे विजेची उपलब्धता कमी झाली असून पुढील महिनाभर मोठ्या भारनियमनाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात होती; परंतु दीर्घकालीन वीज करार, नवीन व नवीनकरणीय स्रोतांमधून होणार्‍या विजेच्या उपलब्धतेमुळे ही तूट भरून निघणार आहे. महावितरणकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्याने राज्यात कोठेही भारनियमन होणार नाही, असे महावितरणने पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

सध्या राज्यातील विजेची मागणी एकोणीस ते साडेएकोणीस हजार मेगावॅट आहे. ही मागणी दीर्घकालीन करारांतर्गत औष्णिक वीज प्रकल्पातून आणि नवीन व नवीनकरणीय स्रोतांमधून पूर्ण करण्यात येत आहे. एकूण ११४४ मेगावॅट इतकी अतिरिक्त वीज उपलब्ध आहे. पॉवर एक्स्चेंजवरही वीज उपलब्ध असल्याने कोयनेतील वीजनिर्मिती बंद झाली तरीही राज्यात कोठेही भारनियमनासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

480 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे