Breaking News

 

 

‘अक्षरगप्पां’मध्ये उलगडला राष्ट्रप्रतिकांचा अन् टागोरांवरील आक्षेपाचा इतिहास !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रवींद्रनाथ टागोर यांनी ‘जन गण मन’ हे गीत पंचम जॉर्जच्या स्तुतीपर रचले, हा आक्षेप चुकीचा आहे. हे गीत लिहिण्यासाठी टागोर यांनी नकार दिला होता. मात्र या निमित्ताने जी परिषद झाली त्यासाठी त्यांनी हे गीत लिहिले होते. जॉर्जच्या स्वागतासाठीचे गीत इतर कवींकडून लिहून घेण्यात आले होते. याबाबत टागोर यांनी खुलासा केला होता, असे सांगत पुणे येथील मिलिंद सबनीस यांनी राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राष्ट्रध्वज, प्रतिज्ञा आणि राजमुद्रा या राष्ट्रप्रतिकांचा इतिहास उलगडला. निमित्त होते ‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्यावतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘अक्षरगप्पां’च्या १०३ व्या भागाचे.

सबनीस यांनी अतिशय विस्ताराने या प्रतिकांच्या निर्मितीमागील अनेक कहाण्या या वेळी विशद केल्या.  ते म्हणाले की, ‘जन गण मन’ चे पहिले गायन अधिवेशनामध्ये टागोर यांनी सहकाऱ्यांसमवेत केले होते.  सारनाथच्या गांधारशैलीतील शिल्पास्तंभावरून तीन मुद्रेचा सिंह ही राजमुद्रा तयार करण्यात आली. या मुद्रेवर ‘सत्यमेव जयते’ हे शब्द असावेत यासाठी आंध्रप्रदेशातील सी. व्ही. वारद यांनी भारत सरकारशी ३० वर्षे लढा दिला. यानंतर हे शब्द वापरण्याचे मान्य करण्यात आले. आंध्रप्रदेशातीलच निसर्गोपचार तज्ज्ञ, लेखक पॅडेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये आपल्या शाळेतील मुलांसाठी तेलगू भाषेत पहिल्यांदा प्रतिज्ञा लिहिली. नंतर ती सर्व देशभर मान्यता पावली. 

१८५७ सालच्या बंडावेळी जो ध्वज तयार करण्यात आला होता त्यामध्ये भाकरी आणि कमळ या चिन्हांचा वापर करण्यात आला होता. देशासाठी पहिला ध्वज तयार करण्याची कामगिरी भगिनी निवेदिता यांनी केली. सभोवती असलेल्या १०८ ज्योती आणि त्यामध्ये इंद्राचे अस्त्र दाखवून त्यावर वंदे मातरम लिहण्यात आले होते.  बंकिमचंद्र चटर्जी यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी लिहलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा आपले राष्ट्रगीत ठरले नव्हते. त्यामुळे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम’ ही दोन्ही गीते गायिली गेली. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे मार्च सॉंग म्हणून हे गीत म्हटले जाई अशी माहिती सबनीस यांनी दिली.

यावेळी सुभाषचंद्र बोस यांची चित्रफित आणि टागोर यांनी गायिलेले वंदे मातरम ऐकायला मिळाल्याने श्रोते भारावून गेले. अक्षर दालनचे रविंद्र जोशी यांनी स्वागत, समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.  

कोल्हापूरची आठवण

सबनीस म्हणाल की, कोल्हापूरचे अल्लादियाँँ खाँँ यांचे चिरंजीव बुर्जीयां खाँँसाहेब यांनी ‘वंदे मातरम’ गीत नव्याने बसवण्यासाठी घेतले होते. मात्र याच दरम्यान त्यांचे निधन  झाल्यामुळे हे काम अपूर्ण राहिले.

135 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे