Breaking News

 

 

बाजारभोगावच्या उपसरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

बाजारभोगाव (प्रतिनिधी) : बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथील उपसरपंच रोहन गुरव यांच्यावरील अविश्वासाचा ठराव आज (सोमवार) बहुमताने मंजूर झाला. त्यामुळे गुरव यांना पदत्याग करावा लागणार आहे. माझ्यावरील अविश्वासाचा ठराव हा सदस्यांनी केलेला डाव असून याविरोधात मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे गुरव यांनी सांगितले. सरपंच, सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे व विकासकामांमध्ये अडथळा आणणे या कारणावरून सरपंच नितीन पाटील यांच्यासह आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. 

दीड वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत  जनसुराज्य शक्ती पक्षाला तीन जागा मिळाल्या. तर सरपंचपदाच्या निवडणुकीत जनसुराज्यचेच नितीन पाटील विजयी झाले. विरोधी गटाचे  जयसिंगराव हिर्डेकर, राजाराम कारखान्याचे संचालक पांडुरंग पाटील व वैकुंठनाथ भोगावकर यांच्या गटाला सहा जागा मिळाल्या. त्यामुळे उपसरपंचपदी रोहन गुरव यांना संधी देण्यात आली होती. विरोधी सहापैकी चार सदस्यांनी नितीन पाटील गटाशी हातमिळवणी केली. नितीन पाटील गटाचे चार सदस्य व विरोधी गटाचे चार अशा आठ सदस्यांनी एकत्र येऊन रोहन गुरव यांच्याविरोधात पन्हाळा तहसिलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता.

आज झालेल्या विशेष सभेत तहसिलदार रमेश  शेंडगे यांच्या उपस्थितीत हात उंचावून ग्रामपंचायत कार्यालयात मतदान घेण्यात आले. ठरावाच्या बाजूने नितीन पाटील, बाबासाहेब खोत, मनिषा खोत, सविता नाईक, नर्मदा पाटील, अपर्णा भोगावकर, प्रकाश पोवार व श्वेता कांबळे अशा  आठ तर विरोधात रोहन गुरव यांचे एक मत अशा फरकाने अविश्वास ठराव मंजूर झाला. अमोल गवळी हे सदस्य गैरहजर होते. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असून त्यानंतर नविन  उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडेल अशी माहिती तहसिलदार शेंडगे यांनी सांगितली. यावेळी नायब तहसिलदार अनंत गुरव, मंडल अधिकारी बी. एस. खोत , तलाठी पर्वतेवार, ग्रामसेवक संदीप मोरे , पोलीस पाटील छाया पोवार आदी उपस्थित होते. उपसरपंचपदी  मनिषा दत्तात्रय खोत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

पदावर नसलो तरी जनहितासाठी व समाजसेवेसाठी झटत राहणार असून अविश्वास ठराव हा माझ्या विरोधात केलेला डाव असून या  विरोधात मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे रोहन गुरव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंगराव हिर्डेकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल गवळी, प्रभाकर मोहीते आदी उपस्थित होते.

1,062 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

 

क्रीडा