मुंबई (प्रतिनिधी) : सीमाभागामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी दोन्ही राज्यांनी दिल्लीत ठरवल्याप्रमाणे वागले पाहिजे. सीमावादाच्या आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधावा, अशी मागणी गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. ते मुंबईत बोलत होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी वारंवार वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम केल्याचा घणाघात करून अजित पवार म्हणाले, सीमावाद पेटवणारा सूत्रधार कोण आहे, हे का घडले, असा विरोध का आणि आंदोलन का झाले? यात जाणीपूर्वक कोणी ट्विटवर बातम्या सोडल्या आणि त्यातून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. या भावनांचा उद्रेक होऊन या सगळ्या गोष्टी घडल्या, हे सारे समोर आले पाहिजे. आता काही जणांना असे वाटते की, हे कोणीतरी विरोधकांनी केले. अशी संशयाची सुई घेतली जाते. मात्र, यात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही कधीही राज्याच्या आणि देशाच्या एकसंधतेला धक्का लागणार नाही, कुठलीही चुकीची गोष्ट आम्हा लोकांकडून कदापिही घडणार नाही. हा सातत्याने दृष्टिकोन आम्ही वेगवेगळे राजकीय पक्ष ठेवत असतो, तरी पण कुठली शंका-कुशंका केंद्र सरकारला वाटत असेल, दोन राज्यातल्या प्रमुखांना वाटत असेल, तर त्यातले दूध का दूध आणि पानी का पानी पुढे आले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

अजित पवार म्हणाले, सीमावाद पेटवणारा मास्टरमाईंड कोण आहे? बोम्मई यांनी तशा प्रकारचे स्टेटमेंट केले नसते, तर बरे झाले असते. आपण राज्याची निर्मिती झाल्यापासून निपाणी, बेळगाव कारवार मागतोय. त्यांनी त्यासंबंधी वक्तव्य केले. नंतर जतसंबंधी वक्तव्य केले. त्यातून बोम्मई महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करतायत, अशी भावना महाराष्ट्रवासीयांच्या आणि सीमावासीयांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.