कोल्हापूर शहर काँग्रेसची ‘चिंतन-मंथन’ बैठक… : ज्येष्ठ नेत्यांची मात्र अनुपस्थिती

1 1

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभेच्या निवडणूकीतील काँग्रेसचे अपयश, राहूल गांधी यांचे अथक प्रयत्न, सोनिया गांधींची संसदीय नेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन आणि आगामी विधानसभा निवडणूकीसाठीची व्यूहरचना यावर कोल्हापूर शहर काँग्रेसने आज (सोमवार) बैठक घेऊन चिंतन आणि मंथन केले. या बैठकीला ज्येष्ठ नेत्यांची मात्र अनुपस्थिती होती.

काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत लोकसभेच्या निवडणूकीत काँग्रेसला आलेल्या अपयशाबद्दल उपस्थितांनी मते मांडली. याबरोबरच काँग्रेस नेतृत्वाने केलेल्या प्रयत्न आणि त्यागाबद्दल त्यांचे आभार मानले. प्रल्हाद चव्हाण यांनी पक्षाची संघटनात्मक बाजू बळकट करुन भविष्यात जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात प्रखर आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

सार्वत्रिक निवडणूकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशिनबाबत जनमानसात संभ्रामावस्था असून ईव्हीएमला विरोध करुन विधानसभेसाठी मतपत्रिकेद्वारे निवडणूक घ्यावी, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण हे मतदारसंघ पारंपरिक काँग्रेसचेच असल्याने या दोन्ही ठिकाणी पक्षाच्या निष्ठावान आणि जेष्ठ कार्यकर्त्यांचा विचार व्हावा, असाही ठराव करण्यात आला.

संघटनात्मक कार्य, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन याबाबत उपस्थितांनी मते व्यक्त केली. या बैठकीसाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी किंवा नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनीच हे चिंतन आणि मंथन केले.

यावेळी महंमद शेख, संपतराव पाटील, विजयसिंह माने, प्रदिप चव्हाण, सचिन चव्हाण, किरण मेथे, वैशाली महाडिक, लिला धुमाळ, हेमा लुगारे, स्मिता माने, एस.के.माळी, पार्थ मुंडे, बाळाबाई निंबाळकर, रंगराव देवणे आदी उपस्थित होते.

1 Comment
  1. Ganesh Godik says

    Informative

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More