कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यभरात गोवरचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका सतर्क झाली आहे. यासाठी शहरात एक विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. महापालिकेची ही विशेष मोहीम दि. १५ ते २५ डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार असून, यादरम्यान कोल्हापूर शहरातील सर्व भागांत घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.
कोल्हापूर शहरातील सर्व आरोग्य केंद्रांना गोवर, रुबेला लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात आशा स्वयंसेवकांच्या मार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. गोवरच्या उद्रेक प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाच्या स्वयंसेविकांना माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. ९ ते ११ महिन्यांच्या मुलांना गोवर, रुबेलाचा पहिला डोस, तर १६ ते २४ महिन्यांच्या मुलांना दुसरा डोस देणे आवश्यक आहे. त्यामुळे या सर्वेक्षणादरम्यान पात्र बालकांना महापालिकेतर्फे जीवनसत्व ‘अ’चे डोस देण्यात येत आहेत. या सर्वेक्षणात गोवर, रुबेलाचा डोस राहिलेल्या बालकांची यादी करून त्यांच्यासाठी दि. १५ ते २५ डिसेंबर कालावधीत महापालिकेतर्फे गोवर लसीकरणाच्या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे.