कुरुंदवाड (प्रतिनिधी) : सहकाररत्न स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त शरद साखर कारखाना, नरंदे व शरद कृषी महाविद्यालय यांच्या विद्यमाने, कृषी विभागाच्या सहकार्याने जयसिंगपूर येथील सिद्धेश्वर मंदिरासमोरील पटांगणावर दि. ९ ते १२ फेब्रुवारी अखेर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती शरद साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

महापूर व त्यानंतर कोरोना महामारीची दोन वर्षे यामुळे जयसिंगपूरमध्ये यापूर्वी सातत्याने पाच वर्षे भरत असलेले कृषी प्रदर्शन गेल्या तीन वर्षांत भरवता आले नाही. त्यामुळे आता होणारे कृषी प्रदर्शन भव्य व दिव्य प्रमाणात भरवले जाईल असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटले आहे. या कृषी प्रदर्शनाचा इव्हेंट रिसोर्सेस इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सांगली यांच्या माध्यमातून होणार आहे. या कृषी प्रदर्शनात १५  कंपन्यांच्या ट्रॅक्टरचे स्टॉल तसेच गाय, म्हैस, बैल यांच्या प्रदर्शनातील समावेशासह द्राक्ष, हळद व ऊस पीक स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. शेतीमध्ये विविध प्रयोग करून पिकांचे उत्पादन वाढवणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

कृषी प्रदर्शनामध्ये तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन, क्षारपड जमिनीमधून पीक उत्पादन, आंबा,  झेंडू, पपई यासारख्या अनेक पिकांच्या उत्पन्नाबाबत मार्गदर्शन, ड्रोनद्वारे पिकांवर औषध फवारणी, बीट गोड ज्वारी आणि ओला कचरा यापासून इथेलॉन निर्मिती, मशरूम उत्पादन कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन देखील होणार आहे. प्रदर्शनास ३५० स्टॉलधारक सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांविषयी सरकारी योजना, वेगवेगळ्या कंपन्यांची धोरणे, अनुदान, आणि पीक विमा याबाबत देखील प्रदर्शनात मार्गदर्शन होणार आहे. दररोज शेती तज्ञांमार्फत शेतकऱ्यांसाठी व्याख्याने होणार आहेत. शेवटच्या दिवशी डॉग शोचे आयोजन केल्याचे आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी म्हटले आहे.