पेठवडगाव (प्रतिनिधी) : येत्या रविवारी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हातकणंगले तालुक्यातील बहुतांश गावांतील प्रचार यंत्रणेने गती घेतली असून, घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत मात्र गावचा विकास मंदगतीने झाला असल्याचे दिसून येत आहे.

हातकणंगले तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत राजकारण हे गटातटातच अडकलेले आहे. पारंपरिक गट व त्यांचे नेते यांच्यातच राजकारण सुरू असते. त्यापासून सामान्य मतदार मात्र अलिप्तच राहतो.

निवडणूक आली की, नेते भरमसाठ आश्वासने देतात व मतदाराला विविध मार्गाने आपलेसे करण्यात येते; परंतु गावचा विकास येथे मात्र दूरच असल्याचे दिसून येते. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीचा विकास देखील अद्याप झालेला दिसून येत नाही. गावांचा विस्तार होत असताना ग्रामपंचायतींना मूलभूत सुविधा देतानाही कसरत करावी लागते. रस्त्यांसाठी शासनाकडून फंड मिळत असला तरी गावातील रस्ते मात्र अत्यंत निकृष्ट आहेत. त्यामुळे नेमका फंड कोठे जिरवला जातो, हे कळून येत नाही. पाण्याची सुविधा देखील अनेक गावांमध्ये अपुरी दिसून येते. पाण्याच्या टाक्या बांधल्या असल्या तरी गावाला अपुरा व अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांतून बोलले जाते. गटारी ही अस्वच्छ असून, वेळेवर कचरा साफ केला नसल्याने अनेक ठिकाणी उकिरडे साठून राहिल्याचे चित्र गावोगावी दिसते. सार्वजनिक स्वच्छतालयांची संख्याही लोकसंख्येच्या मानाने अपुरी आहे.

निवडणूक प्रचारात भ्रष्टाचार हा मुद्दा सत्तारूढ व विरोधकांकडून महत्त्वाचा ठरतो; परंतु निवडणूक संपली की मात्र पुन्हा पाच वर्षे हा मुद्दा गुलदस्तातच राहतो. गट तट, गावकी व भावकी या पलीकडे जाऊन गावाचा विकास हे ध्येय ठेवून निवडणूक लढवणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके असल्यामुळे गाव कारभाऱ्याकडून विकास मात्र मंदगतीने होत असल्याचे दिसून येते.