दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही महिन्यांपूर्वी चलनी नोटांवर लाक्ष्मीदेवी आणि गणपतीचे चित्र छापण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने ही मागणी पूर्ण करावी, असा मतप्रवाह सुरू होता. त्याशिवाय चलनी नोटांवर स्वातंत्र्य सैनिकांपासून ते विविध व्यक्तींची प्रतिमा लावण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. यावर संसदेत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चलनी नोटांवरून महात्मा गांधी यांची प्रतिमा हटवण्यात येणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. 

लोकसभेत चलनी नोटेवरील प्रतिमेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. सरकारकडे मागणी करण्यात आली होती सरकारने या मागणीबाबत काय विचार केला आदी प्रश्न विचारण्यात आले होते. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर देताना सांगितले की, सरकारकडे देवी-देवतांसह प्रतिष्ठित व्यक्ती, प्राण्यांचे फोटो चलनी नोटांवर छापण्याबाबत मागणी करण्यात आली होती. आरबीआय कायदा १९३४ मधील कलम २५ अंतर्गत, बँक नोट डिझाइन, फॉर्म आणि सामग्रीच्या वापराबाबत आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारशीनंतर सरकारकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच बदल शक्य आहेत, असे त्यांनी म्हटले.

महात्मा गांधी यांचा चलनी नोटांवरून चलनी फोटो वगळण्यात येणार नसल्याचे सांगून पंकज चौधरी म्हणाले, ६ जून २०२२ रोजी आरबीआयने सध्याच्या चलनी नोटांमध्ये कोणताही बदल करण्याचा प्रस्ताव नसल्याचे सपष्ट केले आहे. त्यावेळी आरबीआयने महात्मा गांधी यांचा फोटो हटवण्यात येणार नसल्याचे सांगितले.