कोल्हापूर (प्रतिनिध) : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा (पुरुष व महिला) या नावाने शासकीय कुस्तीचे स्पर्धेचे आयोजन धुळे जिल्ह्यात केले आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून पुरूष व महिला असे खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाने सातत्याने पाठपुराव केला होता.

फ्री स्टाईल गटात १०० पुरुष खेळाडू, ग्रीको रोमन गटात १०० पुरुष खेळाडू तर फ्री स्टाईल गटात १०० महिला खेळाडू असे एकूण ३०० पैलवान सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उद्‌घाटन राज्याचे क्रीडामंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाने सप्टेंबर महिन्यात निवेदन देऊन या स्पर्धा घेण्यात याव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

भारतासाठी पहिले वैयक्तिक व कुस्तीतील पहिले ऑलिम्पिक ब्राँझपदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांनी कुस्ती क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून राज्यस्तरावर खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा ही राष्ट्रीय पातळीवर घेतली जात होती. कालांतराने तिचे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रूपांतर करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील कुस्तीला संजीवनी देण्यासाठी ही स्पर्धा धुळ्यात आयोजित करण्यात आल्याचे क्रीडामंत्री गिरीष महाजन सांगितले आहे.