कोल्हापूर (प्रतिनिधी) : संतसाहित्य व अध्यात्माचे गाढे अभ्यासक सद्गुरू डॉ. गुरुनाथ मुंगळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार प्रदान करण्यासाठी सात लाख रुपयांचा निधी देऊन त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजी विद्यापीठावर मोठा विश्वास दाखविला आहे. त्या अनुषंगाने लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी येथे दिली.

सद्गुरू डॉ. गुरूनाथ मुंगळे यांच्या कन्या डॉ. गौरी कहाते यांनी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिवाजी विद्यापीठात ‘स्व. सद्गुरू गुरूनाथ मुंगळे अध्यात्मिक तत्त्वज्ञान साहित्य पुरस्कार’ प्रस्थापित करण्यासाठी सात लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला.

डॉ. कहाते म्हणाल्या, माझे वडील स्व. सद्गुरू डॉ. गुरूनाथ मुंगळे हे इंग्रजी आणि संस्कृत या दोन्ही विषयांतील तज्ज्ञ होते. सन १९९९ पर्यंत त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. संतसाहित्य, अध्यात्म यांचा अभ्यास व लेखन केले. त्यातून त्यांनी लिहीलेली १५ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी त्यांच्या अध्यात्मिक प्रवासाबद्दल व्यक्त केलेले मनोगत येत्या २५ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे प्रकाशित करण्यात येत आहे. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने (मुंबई) त्यांना डी.लिट. मानद पदवी प्रदान केली. त्यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवाजी विद्यापीठामार्फत ‘अध्यात्मिक तत्त्वज्ञान साहित्य पुरस्कार’ देण्यात यावा, असा आमचा मानस असून, त्यासाठी रुपये सात लाख इतका निधी ठेव स्वरुपात विद्यापीठाकडे सुपूर्द करीत आहोत.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या वतीने निधीच्या धनादेशाचा स्वीकार केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. अजय देशपांडे उपस्थित होते.