मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अनेक मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या आणि आंदोलन स्थगित झाले. मध्यंतरी या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली. त्याचदरम्यान राज्य सरकारने पगारवाढ देऊनही एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी लावून धरली.

याच पार्श्वभूमीवर विलीनीकरणाचे गाडे पुढे न सरकल्याने एसटी कर्मचारी पु्न्हा एकदा संप करण्याच्या तयारीत आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी शेवटपर्यंत लावून धरली होती. त्यासाठी एसटी कर्मचारी जवळपास सहा महिने मुंबईच्या आझाद मैदानावर ठाण मांडून बसले होते. या काळात विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले होते.

आता सांगली जिल्ह्यातील सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आ. गोपीचंद पडळकर या संघटनेचे अध्यक्ष असून, आधीच्या एसटी संपात त्यांनी पुढाकार घेतला होता. आता हिवाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवसापासून बेमुदत उपोषण करण्याची घोषणा संघटनेने जाहीर केली आहे.