शिमला (वृत्तसंस्था) : सुखविंदर सिंग सुक्खू यांनी रविवारी दुपारी १.५० वाजता हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची विशेष उपस्थिती होती. मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार असलेल्या प्रतिभासिंह यांना प्रियांका गांधी यांनी आपल्या शेजारी बसवले. सुक्खू यांनी मंचावरून काँग्रेसच्या सर्व आमदारांसह समर्थकांना अभिवादन केले.

रिज मैदानावर राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांनी सुखविंदर सिंग सुक्खू आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांना शपथ दिली. हिमाचलमध्ये स्थिर सरकार स्थापन होईल. आम्ही एकजुटीने काम करू, असेही प्रतिपादन प्रतिभासिंह यांनी केले. प्रतिभासिंह या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार होत्या. सुक्खू यांची भेट घेतल्यानंतर प्रतिभासिंह यांनी सांगितले होते की, त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग यांना मंत्री बनवणे जवळपास निश्चित आहे.

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू चौथ्यांदा, तर मुकेश अग्निहोत्री पाचव्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. यापूर्वी सुखविंदर सिंग सुक्खू हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, एनएसयूआयचे अध्यक्ष, शिमला येथील एमसीचे दोन वेळा नगरसेवक, युवक काँग्रेसचे प्रमुख आणि २०२२ मध्ये निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने ६८ पैकी ४० जागा जिंकल्या असून, भाजपला २५ जागा मिळाल्या आहेत.