कतार (वृत्त्संस्था) : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या मोसमात शनिवारी रात्री उशिरा चौथा उपांत्यपूर्व सामना खेळला गेला. या सामन्यात गतविजेता फ्रान्स आणि इंग्लंड संघ आमनेसामने होते. अत्यंत रोमांचक अशा सामन्यात फ्रान्सने २-१ अशा फरकाने इंग्लंडवर मात करत शानदार विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सने पहिल्यांदाच इंग्लंडचा पराभव केला आहे. यापूर्वी १९६६ आणि १९८२ मध्ये इंग्लंडने फ्रान्सचा पराभव केला होता.

या विजयासह फ्रान्सने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जिथे फ्रान्सचा संघ मोरोक्कोशी भिडणार आहे. मोरोक्कोच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दमदार खेळी करत दिग्गज फुटबॉरल ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या पोर्तुगालचा १-० अशा फरकाने पराभव केला. सेकंड हाफच्या सुरुवातीलाच इंग्लंडने आपली आक्रमक खेळी दाखवत फ्रान्सवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली. त्याचा फायदा ५४ व्या मिनिटालाच पाहायला मिळाला. यादरम्यान फ्रान्सच्या फाऊलवर इंग्लंडला पेनल्टी मिळाली. यामध्ये इंग्लिश कर्णधार हॅरी केनने संधी सोडली नाही आणि गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला.

या गोलसह हॅरी केनने इंग्लंडसाठी ५३ गोल करणारा संयुक्त सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. याआधी वेन रुनीनंही इतकेच गोल केले होते; पण ऑलिव्हियर जिरूडने हॅरी केनच्या मेहनतीवर पाणी फेरले आणि ७८ व्या मिनिटाला अँटोनी ग्रीझमनच्या पासवर गोल करत जिरुडने पुन्हा फ्रान्सला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

पहिल्या पेनल्टीवर गोल केल्यानंतर हॅरी केनची दुसरी पेनल्टी हुकली, त्यामुळे इंग्लंडच्या विश्वचषकाच्या आशाही धुळीला मिळाल्या. त्याच्या सहकाऱ्यांनी या स्टार स्ट्रायकरला साथ दिली. या विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्स २-१ ने आघाडीवर असताना खेळाच्या ८४ व्या मिनिटाला इंग्लंडला बरोबरी साधण्याची संधी होती, पण पेनल्टीवर केनचा फटका क्रॉसबारवर गेला. यासह उपांत्य फेरी गाठण्याच्या इंग्लंडच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत.

उपांत्य फेरीच्या लढती : १३ डिसेंबर : क्रोएशिया वि. अर्जेंटिना (रात्री उशिरा १२.३० वाजता), १४  डिसेंबर : मोरक्को वि.  फ्रान्स (रात्री उशिरा १२.३० वाजता).