गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आमदार हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाते. सामाजिक बांधिलकीतून या फाऊंडेशनचे कार्य अखंडपणे सुरू आहे, असे प्रतिपादन फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांनी केले. जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे फाऊंडेशन सदैव अग्रभागी असेल, असेही ते म्हणाले.

गडहिंग्लजमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराच्या प्रारंभ कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते. मुख्य प्रशिक्षक योगेश पाटील उपस्थित होते. एक महिन्याहून अधिक काळ चालणाऱ्या या अनिवासी मोफत शिबिराचे आयोजन आमदार हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने केले आहे.

मुश्रीफ पुढे म्हणाले, साधारणत: एक महिनाभराहून अधिक काळ चालणाऱ्या अनिवासी स्वरूपाच्या या प्रशिक्षणामध्ये पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा व वैद्यकीय परीक्षा यासंबंधीची तयारी काटेकोरपणे करून घेतली जाणार आहे. आजअखेर फाउंडेशनच्यावतीने वेगवेगळ्या नोकरीच्या भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या आयोजन केले होते. त्या अंतर्गत पोलीस दलामध्ये तीनशेहून अधिक, एसटीमध्ये सहाशेहून अधिक, सैन्य दलात व सीमा सुरक्षा दलांमध्ये तीनशेहून अधिक जणांची भरती झाली आहे.

आमदार मुश्रीफ यांनी गेल्या ३५ वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीमध्ये ज्या -ज्या ठिकाणी संधी मिळाली त्या -त्या ठिकाणी बेरोजगारांच्या हाताला रोजगार दिला. यापुढेही बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू. रुग्णसेवा, निराधारांची सेवा यासह विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये फाऊंडेशन अग्रेसर आहे.

यावेळी उदयराव जोशी, अनिल कुराडे, सतीश पाटील, हारून सय्यद, महेश सलवादे, गुंडेराव पाटील, ॲड. दिग्विजय कुराडे, शर्मिली पोतदार, माधुरी शिंदे, रेश्मा कांबळे, अरुणा कोलते, अमर मांगले, अवधूत रोटे आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत प्रा. सिद्धार्थ बन्ने यांनी, तर प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष किरणअण्णा कदम यांनी केले.