Breaking News

 

 

राशिवडेत भारत सोसायटीकडून नियमबाह्य पद्धतीने दुकानगाळ्यांचा लिलाव ; संचालकाचाच आरोप

राशिवडे (प्रतिनिधी) : जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असताना राशिवडे बुद्रुक (ता. राधानगरी) येथील भारत विकास सोसायटीने नियमबाह्य पद्धतीने दुकानगाळ्यांचा लिलाव केला आहे. याबाबत चेअरमन, संचालक आणि सेक्रेटरी यांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा संस्थेचे संचालक ज्ञानदेव चांदणे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे. तालुका उपनिबंधकांनी याची दखल घेऊन संस्थेस याप्रकरणी खुलासा करण्यात यावा, असा आदेश दिला आहे.

याबाबत चांदणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली असताना संस्थेच्या मालकीच्या इमारतीतील दुकान गाळ्यांचा लिलाव करण्याचा घाट चेअरमन, काही संचालक आणि सेक्रेटरी यांनी घातला. १९ एप्रिल रोजी एका दैनिकात लिलाव नोटिसीची जाहिरात प्रसिद्ध केली. संस्थेच्या कार्यालयात मुदतीत अर्ज देण्यास गेलो होतो. नियमाप्रमाणे बयाणा रक्कम भरण्यासही तयार असताना संचालकांनी अर्ज घेण्यास मनाई केली आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे २२ एप्रिल गाळ्यांचा संस्थेच्या सभागृहात लिलाव करण्यात आला. संचालक या नात्याने सदर माझा विरोध असताना देखील संचालक व सेक्रेटरी यांनी संगनमत करुन घाई-गडबडीने हा लिलाव केला आहे. लिलाव करण्यापूर्वी दोन दिवस शासकीय सुट्टी असताना शेवटच्या दिवशी संस्थेचा दरवाजा बंद करून कामगार व सेक्रेटरी या दिवशी मुद्दाम गैरहजर राहिले. त्यामुळे सभासदांना अर्ज वेळेत देता आले नाहीत. आम्ही आणखीन दोन दिवस लिलावास मुदतवाढ मिळावी असा अर्ज दिला होता. पण त्या अर्जाची संचालकांनी दखलच घेतली नाही. कारण संचालकांना आपले बगलबच्चे, नातेवाईक, सगेसोयरे यांचे नावे दुकानगाळे हवे होते. मी संस्थेचा माजी व्हा. चेअरमन, विद्यमान संचालक व सभासद असून संस्थेचा जनरल ठराव २०१८/२०१९ व २४/०४/२०१९ चा गाळे लिलाव ठराव कागदोपत्री माहिती मागितली असता चेअरमन व सेक्रेटरी यांनी मला माहिती देण्यास नकार दिला आहे. आचारसंहिता लागू असताना जर जाहिरात प्रसिद्ध केली असेल तर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाचा, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा व आदर्श आचार संहितेच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी चेअरमन, संचालक व सेक्रेटरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. लिलाव जाहिरात ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेतली आहे का ? ही लिलाव जाहिरात ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर का व कोणत्या नियमानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, याचा खुलासा व्हावा. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी व संस्थेची इमारत पाडल्याप्रकरणी चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर योग्य ती शासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या अर्जाची दखल न घेतल्यास मला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणास बसावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

2,328 total views, 12 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग