Breaking News

 

 

दुर्गराज रायगडावर असा होणार शिवराज्याभिषेक सोहळा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदा दुर्गराज रायगडावर पाच व सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. हा सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती समितीचे फत्तेसिंह सावंत, उदय घोरपडे, अमर पाटील यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिली.

फत्तेसिंह सावंत म्हणाले की, युगपुरुष छत्रपती शिवरायांची साडे तीनशे वर्षांपूर्वी लोकशाहीच्या तत्वावर स्वराज्याची उभारणी केली. आणि त्यांचा ६ जुन १६७४ रोजी राज्याभिषेक झाला. हा दिवस खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा होण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी ५ व ६ जूनरोजी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. यावर्षी या सोहळ्यासाठी देशभरातून इतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त, इतिहासप्रेमी याबरोबरच परदेशातील पाच देशाचे प्रतिनिधी येणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्रभर व संपूर्ण देशातील दीड लाखांच्यावर शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.

पाच जूनला सायंकाळी पाच वाजता जागर शिवकालीन युद्धकलेचा हा मर्दानी खेळाच्या प्रात्याक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शिवकालीन हत्यारांचे प्रात्याक्षिक तसेच हे खेळ शिकवणाऱ्या वस्तादांचा सत्कार केला जाणार आहे. सहा जूनला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करुन सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा या संकल्पनेवर पालखी मिरणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये सर्व धर्मातील बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार यांना त्यांच्या पारंपारिक वेषात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालखीचा मार्ग राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर असा आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडच्या पायथ्यापासून राजसदरेपर्यंत आवश्यक ती सर्व सुविधा, बंदोबस्त, पार्किंगची सोय, अन्नछत्र, आरोग्यसेवा, सुरक्षा याचे चोख नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी समितीचे शहाजी माळी, हेमंत साळोखे, संजय पवार आदी उपस्थित होते.

528 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा