मुंबई (प्रतिनिधी) : साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी, ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

वृध्दापकाळाने त्यांचे निधन झाल्याच माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली आहे. त्यांची प्रकृती गेली काही दिवस खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुलोचना चव्हाण यांचा १३ मार्च १९३३ मध्ये जन्म झाला. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षांपासून त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. रंगल्या रात्री या चित्रपटासाठी त्यांनी पहिली लावणी गायली होती. फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ अशा दर्जेदार लावण्या सुलोचना चव्हाण यांनी गायल्या. म्हणूनच, लावणी सम्राज्ञी म्हणून त्यांची जगभर ख्याती पसरली.

केवळ मराठीच नाही तर त्यांनी अनेक हिंदी गाणीही सुरेलबद्ध केली आहेत. हिंदी चित्रपटासाठी अल्बम गाणी रेकॉर्ड केली आहेत. छोरी चोरी आग सी दिल मे लगाके, उल्फत जिसे कहते है, जीने का सहारा है, मौसम आया है रंगे अशी अनेक गाणी त्यांनी गायली आहेत. पद्मश्री पुरस्कारासह त्यांना लता मंगेशकर पुरस्कार (२०१०), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१२) आदी सन्मानाने गौरवण्यात आले होते.

सुलोचना चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण अवघे चौथीपर्यंत झाले होते. शिक्षणात फारशी गोडी नसल्याने त्या संगीत क्षेत्राकडे वळल्या. नवव्या वर्षी त्यांनी गायनाला सुरुवात केल्यानंतर अकराव्या वर्षांपासून त्यांनी पार्श्वगायनास सुरुवात केली होती. कृष्मसुदामा या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम आवाज दिला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचा कोल्हापूरच्या श्यामराव चव्हाण यांच्याशी विवाह झाला. विशेष म्हणजे श्यामराव यांनाही संगीताची आवड होती.

१९६२ साली रंगल्या रात्री या चित्रपटासाठी त्यांनी पहिली लावणी गायली. जगदीश खेबुडकर यांचे शब्द आणि वसंत पवार यांनी या गाण्याला संगीत दिले होते. नाव गाव कशाला पुसता आहो मी आहे कोल्हापूरची, मला म्हणतात हो लवंगी मिरची हे गाणं म्हणजे त्यांच्या आयुष्यातील माईलस्टोन ठरलं. त्यानंतर त्यांनी अनेक ठसकेबाज लावण्या गायल्या.