औरंगाबाद (वृत्तसंस्था) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असे विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. चंद्रकांत पाटील हे पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

महाराष्ट्रातील महापुरूषांबद्दल मागील काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधाने केली जात आहेत. यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता भाजपचे नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं असून यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या. आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. शाळा कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. हे विधान करताना चंद्रकांत पाटीव यांनी गळ्यातील उपरणे पुढे पसरून दाखवले. पाटील म्हणाले की, ते म्हणायचे मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे.