कोल्हापूर (प्रतिनिधी) : आशा व गट प्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आरोग्य अभियान मागणी दिवस म्हणून संपूर्ण देशभर जवाब दो आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आशा वकर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात आशा व गटप्रवर्तकांना आरोग्य खात्यात कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नियुक्ती द्यावी, किमान वेतनाच्या आधारे आशांना वेतन देण्यात यावे, आशा व गटप्रवर्तकांचे मानधन दर महिन्याच्या ५ तारखेला मिळावे, आशा व गटप्रवर्तकांना आभा कार्ड, हेल्थकार्ड काढणे अशा विना मोबदला कोणत्याही कामाची सक्ती करु नये, आरोग्य तपासणी व मेडिक्लेम योजना लागू करावी, मोबाईल भत्ता, स्टेशनरी भत्ता मिळावा, अशा २६ मागण्या करण्यात आल्या.

यावेळी कॉ. चंद्रकांत यादव, कॉ. उज्ज्वला पाटील, कॉ. संगीता पाटील, कॉ. कविता पाटील, कॉ. सुरेखा तिसंगीकर, कॉ. विमल अतिग्रे यांच्यासह युनियनचे पदाधिकारी, आशा व गटप्रवर्तक महिला उपस्थित होत्या.