मुंबई (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरातून उठणाऱ्या मेंडोस चक्रीवादळ थैमान घालण्यास सुरूवात झाली आहे. या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. ११ ते १४ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रातील काही ठिकणी हवामानात बदल झाल्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे तिन्ही राज्यांमध्ये मुसळधार पावसासोबत वादळी वारेही वाहण्याची शक्यात हवामान विभागाने वर्तवली आहे.

चक्रीवादळाचा परिणाम नाशिक, खान्देश ओलांडून  मध्य प्रदेशाच्या बेतुल, बऱ्हाणपूर, देवास, होशंगाबाद, मांडला व छत्तीसगडच्या काही भागापर्यंत जाणवू शकतो. दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढलेले किमान तापमान व ढगाळ वातावरण पुढील ४-५ दिवस तसेच राहील, असे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे चेन्नईपासून ९०० किमी आग्नेयेस जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर तिन्ही राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नसला तरी दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूच्या १३ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तमिळनाडूतील तिरुवरूर आणि तंजावर जिल्ह्यात पावसाच्या इशाऱ्यामुळे आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे