नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम-मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात रेल्वेकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये भरतीसाठी अर्ज करण्यास चांगली संधी प्राप्त झाली आहे.

भारतीय रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण २५२१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेची अधिकृत वेबसाईट wcr.indianrailways.gov.in वर क्लिक करुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, १७ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष यादरम्यान असणे गरजेचे आहे. आरक्षित प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय (ITI), डिप्लोमा (NCVT किंवा SCVT) असणे देखील गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागेल. SC, ST, PWD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही.